Monday, August 25, 2014

हजारों ख्वाहिशें ऐसी - 01


तशी ती करिअरची सुरुवात असते. दुनियादारी अनुभवून स्वप्नांचा चुराडा होणेही बाकी असते. आयुष्य ऐन उमेदीत असतं अन नेमक्या अशाच वेळी 'ती' भेटते. सुखाच्या सार्‍या कल्पना, आयुष्याची सगळी स्वप्न 'ती' च्या भोवती गुंफली जातात. आई-बाबा सांगतात तेव्हा पटत नाही पण 'ती' च्या साठी करिअर 'सिरियसली' घेतलं जातं. लवकरात लवकर सेटल होण्याची घाई होते. आणि हे सगळं सुरू असताना अचानक मैफीलीतून तिची एक्झीट होते. कधी काळी चुकून लागलेल्या वर्ज्य स्वराने पूर्ण आयुष्यच बेसूर होऊन जातं. तिच्यासोबत अर्धा रस्ता चालल्यावर ना पुढे जायची उमेद असते अन मागे फिरण्याचे रस्ते आठवत नसतात. 'ती' च्या साठी स्वतःच्या मारलेल्या इच्छांची भूतं भूतकाळाचं ओझ बनून पाठीवर बसतात अन 'ती' च्याबरोबर पाहिलेल्या अर्धवट स्वप्नांच्या सावल्या भविष्काळात सोबत करणार असतात!

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले...

अर्थात 'ती' च्याशिवाय आयुष्य थांबत नाही. गुलमोहर अन बहाव्याच्य ओसरणार्‍या बहराबरोबर त्याला  लगडलेल्या 'ती' च्या आठवणीही गळून पडत असतात. एखादं चांगलं गाणं ऐकलं की 'हे गाणं ऐकताना तिचा चेहरा कसा फुलला असता...' वगैरे भावनाही बोथट होत जातात. दारू प्यायल्यावर का होईना 'ती'च्याशिवायही एखादी मुलगी सुंदर वगैरे वाटायला लागते. कटट्यावरच्या निव्वळ पांचट जोकवरही खदखदून हसणं जमायला लागतं. अन नेमक्या त्याच वेळी 'त्याच' चाफ्याच्या झाडाखाली 'ती' अचानक नजरेस पडते. मधमाशांच मोहोळ फुटावं तशा जुन्या आठवणींचे दंश होत रहातात. एका क्षणात जखमेवर धरू पहाणारी खपली विरून जाते आणि शरिरातून वहाणर्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून 'ती' ने दिलेल्या वेदना वहात रहातात. पण हाईट म्हणजे एवढे दिवस ओढून घेतलेल्या सोंगापेक्षा त्या वेदनांमधूनही जास्त समाधान मिळतं

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले....

'ती' च्याशिवायही जगात बर्‍याच चांगल्या गोष्टी असतात. पण त्या सगळ्यांना आता 'ती' चे संदर्भ चिकटलेले असतात. कोलाजमधल्या रोझ मिल्कशेकमध्ये तिच्या आठवणी विरघळलेल्या असतात. प्राजक्त अन रातराणीच्य सौरभात 'ती' च्या धुंद आठवणी असतात. कोसळणार्‍या पावसात 'ती' च्या चिंब  भिजलेल्या आठवणी असतात. कॅमेराच्या फ्रेमवरही 'ती' च्याच मोहक अदा असतात. प्रत्येक रस्त्यावर, पाउलवाटेवर 'ती' चीच छाप असते. अगदी प्रत्येक समुद्रकिनार्‍यावरच्या वाळूतही 'ती' चच नाव कोरलेलं असतं. अनंत आकाशात पसरलेल्या चंदण्यातही 'ती' चीच अधुरी स्वप्नं पसरली असतात.

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले.....

तशी माझ्यापेक्षाही दु:खी माणसं असतात जगात. पण त्यांच्याकडे बघून  सुखाने वगैरे जगता येत नाही. आयुष्य झोकून देऊन 'समाजसेवा' वगैरे करणही जमत नाही. मग 'सुखात' जगण्याचा अट्टहास मंदावत जातो. दारू, सिगरेट वगैरे कमी करण्याचे प्रयत्नही नकळत सुटून जातात. मनाने स्वीकरलेला पराभव देहालाही जाणवतो बहुदा. मग आजारांना प्रतिकार करणार्‍या पांढर्‍या पेशी देखील शरीराची साथ सोडून जातात. त्यावर ट्रीटमेन्ट वगैरे घेण्याचा विचारही मनात येत नाही. जणू 'ती' च्या शिवायचं भविष्य शांतपणे स्वीकारलं जातं. आई-बाबा, मित्र-मैत्रीणी, जवळची माणसं सगळे पाश नकळत तोडले जातात. नोकरीच्या नावाखाली दूर कुठे तरी निघून जाता येतं. पण तिथेही संदीप म्हणतो तस 'श्वासांची लय फक्त कमी होते, पण थांबत नाही!' आजाराचं नाही पण एकटेपणांच ओझं असह्य होत जातं.

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले...

'जिंदगी झंड हैं, फीर भी घमंड हैं!'  Destined to Destruct  म्हणून 'ती' च्या फेवरेट समुद्रकिनारी जाणं होतं. Self Destruction ची सुरुवात आधीच झाली असती, शेवटाचाही तयारीही आता  पूर्ण झाली असते. पण  शेवटच्या क्षणी आपल्या आयुष्याची फ्लॉप स्टोरी जगाला सांगावीशी वाटते.  साला मरेपर्यंत पारोला छळूनही 'देवदास' अजरामर होऊ शकतो, मग माझी स्टोरी हीट नाही, पण कीमान 'बरी' का नाही वाटू शकणार? लोकांचं जाऊ दे, पण 'शेवटच्या क्षाणापर्यंत फरफट सहन केली तरीही तू एकदा 'नाही' सांगितल्यावर 'ती' च्या आस-पास फिरकलोही नाही, किमान 'ती' ला ते जाणवून तरी दिलं नाही, हे तरी 'ती' ला कळू दे. 'ती' च्या बरोबर असतानाही आणि नसतानाही 'ती' च सर्वस्व होती,  हे तरी शेवटच्या क्षणी 'ती' ला समजू देत म्हणून कागद-पेन घेतलं जातं. मात्र शेवटच्या संवेदना मंदावत असताना कागदावर फक्त एवढीच अक्षरं ऊमटतात

हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम 
निकले!

P. S: हे सगळं काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संदर्भ जोडू नये!


- बच्चनगिरी, १८ ऑगस्ट २०१४